भारत आणि बांग्लादेश यांच्यात होणारा एकमेव कसोटी सामना बुधवार 10 जूनपासून फतुल्लाह येथे सुरू होणार आहे. 8 जूनला ढाका येथे पोहोचल्यानंतर टीम इंडिया ला फतुल्लाह येथील मैदानावर सराव करायचा होता. पण बांग्लादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) ने त्यासाठी परवानगी दिली नाही. बांगलादेशचे खेळाडू त्याठिकाणी सराव करणार असल्याने मैदान रिकामे नसल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले.
एकच दिवस करणार होते सराव...
टीम इंडिया आधी केवळ मंगळवारी 9 जूनलाच सराव करणार होती. पण काही दिवसांपूर्वीच खेळाडू 8 जूनला दुपारीदेखिल सराव करतील हे ठरले होते. त्याची माहिती बांग्लादेश बोर्डाला देण्यात आली. तसेच त्यासाठी फतुल्लाह मैदानाची परवानगीही मागण्यात आली होती. पण बीसीबीने टीम इंडियाला बांगलादेशच्या क्रिकेटपटुंच्या सरावाबाबत कारण देत मीरपूरस्थित शेरे बांगला नॅशनल स्टेडियममध्ये सराव करण्यास सांगितले.
अशी होती स्थिती...
शेरे बांगला स्टेडियममध्ये सराव करणे फार सोपे नव्हते. त्याठिकाणी कडक उन होते. त्यामुळे खेळाडुंना फार काळ त्याठिकाणी सराव करणे अवघड जात होते. या स्टेडियमच्या जवळपास हिरवळही नाही. केवळ काही मोठ्या इमारती आहेत. तसेच दमटपणाही फार होता. काही हेल्पर होते पण तेही सावलीच्या शोधात होते. फतुल्लाह ग्राउंडवर मात्र याच्या अगदीच विपरित स्थिती होती. त्याठिकाणी जोरदार वारेही वाहत होते. रविवारी वादळी वारे आल्याने याठिकाणचे तापमान 35 डिग्रीपर्यंत खाली आले होते. तसेच या मैदानाच्या जवळपास हिरवळ आहे आणि अनेक शेडही आहेत, त्यामध्ये सराव करता येतो.
प्रतिकूल परिस्थितीतही केला सराव
विराट कोहलीच्या नेतृत्वात कसोटी खेळण्यासाठी गेलेल्या टीम इंडियाने अशा प्रतिकुल परिस्थितीतही दुपारी सुमारे तीन तास घाम गाळला. आधी सर्व खेळाडुंनी वॉर्म अप केला. त्यानंतर फुटबॉलचा आनंद घेतल्यानंतर विराट, रोहित, विजय, राहाणे, पुजारा आणि धवनने बराच वेळ फलंदाजीचा सराव केला. कोहली नेट्समध्ये चांगली फलंदाजी करत असल्याचे दिसून आले.
गोलंदाजांनीही गाळला घाम
हरभजन सिंग, आर. अश्विन आणि कर्ण शर्माने संपूर्ण सेशनमध्ये गोलंदाजी केली. इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार आणि वरुन अॅरोन यांनीही सुमारे तासभर गोलंदाजीचा सराव केला. त्यानंतर सगळे कोचिंग सेशनसाठी गेले.
9 वर्षांनी होतेय कसोटी
फतुल्ला मैदानावर 9 वर्षांनंतर कसोटी सामना होत आहे. या मैदानावर 2006 मध्ये बांगलादेशने ऑस्ट्रेलियाच्या विरोधात कसोटी सामना खेळला होता. गेल्यावर्षी या मैदानावर टीम इंडियाने काही वन डे सामने खेळले आहेत पण कसोटी सामना प्रथमच खेळत आहे.